टाऊन हॉल
टाऊन हॉलचे बांधकाम इ.स. १८७६ मध्ये गॉथिक वास्तुकला शैलीत करण्यात आले. ही सुंदर इमारत एका विस्तीर्ण आणि आकर्षक बागेच्या मध्यभागी उभी आहे. ही बाग कोल्हापूर शहरातील सर्वात जुन्या बागांपैकी एक मानली जाते.
या बागेत स्थानिक तसेच परदेशी वनस्पतींच्या अनेक प्रजाती आढळतात. येथील अनेक वृक्ष व वनस्पती औषधी, शोभिवंत आणि संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे ही बाग संशोधकांसाठी एक समृद्ध वनस्पती प्रयोगशाळा मानली जाते.
ही जागा अनेक पक्षी, प्राणी, फुलपाखरे आणि कीटक यांचे निवासस्थान तसेच विश्रांतीस्थान आहे. टाऊन हॉल परिसर हा कोल्हापूरमधील वटवाघळांच्या सर्वात मोठ्या निवासस्थानांपैकी एक मानला जातो.
या इमारतीला दोन शिखरे (Spires) आणि उंच उताराचे छप्पर आहे. इमारतीमध्ये एक मोठा मध्यवर्ती सभागृह (Hall) आणि गॅलरी आहे. सभागृहाच्या दोन्ही बाजूंना दोन खोल्या असून त्या समोरील प्रशस्त व्हरांड्याद्वारे मुख्य सभागृहाशी जोडलेल्या आहेत. सभागृहासमोर सुंदर पोर्च असून त्यावर एक प्रशस्त गच्ची (Terrace) आहे. मोठ्या कमानीदार लाकडी दरवाजातून मुख्य सभागृहात प्रवेश करता येतो.
इ.स. १९४९ पासून टाऊन हॉलचा वापर गव्हर्मेट म्युझिअम म्हणून केला जात आहे. संग्रहालयात काचेच्या कपाटांमध्ये विविध ऐतिहासिक वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.
इमारतीच्या उत्तरेकडील भागात एक कला दालन आहे, जिथे नामांकित स्थानिक कलाकारांची चित्रे प्रदर्शित केली आहेत. ब्रह्मपुरी टेकडी येथे झालेल्या उत्खननात सापडलेल्या प्राचीन मूर्ती, चंदन व हस्तिदंती वस्तूंवरील नक्षीकाम, जुनी नाणी तसेच प्रख्यात कलाकारांची चित्रे येथे पाहावयास मिळतात.