सिद्धगिरी संग्रहालय (कणेरी मठ)

सिद्धगिरी संग्रहालय (कणेरी मठ)

कोल्हापूर शहरापासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या कणेरी येथे वसलेले सिद्धगिरी संग्रहालय हे एक अनोखे संग्रहालय आहे. पूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संग्रहालय उभारण्यात आले आहे. येथे पुतळ्यांच्या माध्यमातून प्राचीन भारतीय ग्रामीण जीवन, संस्कृती आणि समाजव्यवस्था जिवंतपणे दाखवण्यात आली आहे.

भारतीय ग्रामीण संस्कृती ही या संग्रहालयाची मुख्य संकल्पना आहे. पूर्वी गावांची अर्थव्यवस्था वस्तुविनिमय (Barter System) पद्धतीवर आधारित होती. प्रत्येक गावात बारा बलुतेदार समाजाच्या गरजा पूर्ण करत असत. यामध्ये सुतार, लोहार, महार, मांग, कुंभार, चांभार, परीट, न्हावी, भट, सोनार, गुरव आणि कोळी यांचा समावेश होता.

सिद्धगिरी संग्रहालयातील पुतळे गावातील लोकांचे दैनंदिन जीवन, त्यांचे व्यवसाय आणि परस्पर सहकार्य यांचे वास्तव चित्रण करतात. त्या काळी मानवी जीवन पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होते आणि निसर्गच त्यांच्या गरजा पूर्ण करत असे.

 

हे संग्रहालय सुमारे 6 एकर क्षेत्रात पसरलेले असून National Highway 48 वर, कोल्हापूर शहराबाहेर स्थित आहे.