शालिनी पॅलेस
शालिनी पॅलेस हे नयनरम्य रंकाळा तलावाच्या च्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले असून, त्याचे बांधकाम १९३२ ते १९४४ या कालावधीत करण्यात आले. या राजवाड्याला कोल्हापूरच्या राजकन्या श्रीमंत शालीनीराजे यांच्या नावावरून "शालिनी पॅलेस" असे नाव देण्यात आले आहे. उंच पाम वृक्ष, हिरवळ आणि सुंदर बागांनी हा राजवाडा वेढलेला आहे. काळ्या दगडावर केलेले नक्षीकाम आणि इटालियन संगमरवर यांचा वापर करून हा राजवाडा बांधण्यात आला आहे. कोल्हापूरच्या महाराजांच्या राजचिन्हांनी सजवलेल्या बेल्जियम काचेच्या पटलांनी युक्त सुंदर लाकडी दरवाजे या वास्तूच्या राजेशाही वैभवात भर घालतात. व्हरांडा आणि पोर्चमधील भव्य काळ्या दगडी कमानी अत्यंत मनमोहक आहेत. १९८७ मध्ये या राजवाड्याचे रूपांतर हॉटेलमध्ये करण्यात आले. महाराष्ट्रातील हे एकमेव वारसा हॉटेल (Heritage Hotel) म्हणून ओळखले जाते. परंतू सध्या ते बंद अवस्थेत आहे.