न्यू पॅलेस (नवा राजवाडा)
न्यू पॅलेस दसरा चौकाच्या उत्तरेकडे स्थित आहे. हा भव्य राजवाडा छत्रपती शाहू महाराज यांनी १८७७ ते १८८४ या कालावधीत बांधला. छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मशताब्दी स्मरणार्थ ३० जून १९७४ रोजी या राजवाड्याचे आकर्षक संग्रहालयात रूपांतर करण्यात आले.
न्यू पॅलेसभोवती हिरवीगार उद्याने, प्राणीसंग्रहालय आणि सुंदर तलाव असून ते पर्यटकांना आकर्षित करतात. येथे एक लहान तळे, बदके, मोर, हरणे आणि राजहंस पाहायला मिळतात.
या संग्रहालयात राजघराण्याने वापरलेल्या दुर्मिळ चित्रकला, ऐतिहासिक वस्तू आणि कलाकृती जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील अनेक ऐतिहासिक वस्तू येथे प्रदर्शित आहेत. छत्रपतींची मौल्यवान छायाचित्रे व चित्रे, शिकारीसाठी वापरलेल्या बंदुका व इतर शस्त्रे तसेच त्यांनी शिकार केलेल्या प्राण्यांचे नमुने आकर्षक पद्धतीने मांडले आहेत.
या राजवाड्यातील मुख्य दरबार हॉल विशेष प्रसिद्ध आहे. एका इटालियन चित्रकाराने येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील विविध प्रसंगांचे चित्रण केले आहे. तसेच पूर्वीच्या काळातील मंत्रिमंडळ बैठकीचे दृश्यही येथे साकारण्यात आले आहे. हीच दरबार हॉलची खासियत आहे.
संग्रहालयाची वेळ:
- सकाळी ९:३० ते ११:००
- दुपारी २:३० ते सायंकाळी ५:३०
टीप: हे संग्रहालय दर सोमवारी बंद असते.