गंधर्वगड किल्ला
स्थान: कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात
पायथा गाव: वाळूकुली
समुद्रसपाटीपासून उंची: ९१६ मीटर
संक्षिप्त इतिहास
गंधर्वगड हा सह्याद्री पर्वतरांगांतील एक ऐतिहासिक किल्ला असून छत्रपती शिवाजी महाराजांनी पुनर्बांधणी केलेल्या १११ किल्ल्यांपैकी एक असल्याचा उल्लेख सभासद बखरीत आढळतो.
जानेवारी १६६६ मध्ये पन्हाळा मोहिमेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे ५,००० सैन्यासह हा किल्ला स्वराज्यात सामील केला. जुलै १६८७ मध्ये काकती कर्यातीचे देसाई आणि हुक्केरी परगण्याचे देसाई यांनी हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून आदिलशहाकडे सुपूर्द केला. त्याबदल्यात त्यांना अनुक्रमे बेळगावमधील आजमनगर आणि चंदगड-आजरा परिसराची देशमुखी देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर काही काळ हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात राहिला.
पुढे सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी कर्नाटक मोहिमेदरम्यान काही काळ या किल्ल्यावर मुक्काम केला. अखेरीस इ.स. १८४४ मध्ये ब्रिटिश सैन्याने हा किल्ला उद्ध्वस्त केला.
किल्ल्याची माहिती
गंधर्वगड हा चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक परिसर असून किल्ल्याच्या पायथ्याशी वाळूकुली हे गाव आहे. येथून किल्ल्यावर पोहोचण्यासाठी सुमारे एक तासाची पायपीट करावी लागते.
किल्ल्याच्या प्रवेशमार्गावर छोटे हनुमान मंदिर आहे. पुढे गावाचे ग्रामदैवत असलेले चालोबा मंदिर आणि वर्षभर पिण्यायोग्य पाणी असलेली प्राचीन विहीर पाहायला मिळते. मंदिरासमोरील मैदानात पूर्वी हिरेकर सावंत यांच्या राजवाड्याचे अवशेष होते. किल्ल्याच्या पूर्व भागात काही जोत्यांचे अवशेष आढळतात. दक्षिणेकडील तटबंदी आजही सुस्थितीत असून त्यामध्ये तीन गुप्त दरवाजे (भुयारी मार्ग) आहेत.
पाहण्यासारखी ठिकाणे
- चालोबा मंदिर
- तीन गुप्त दरवाजे
- प्राचीन शिल्पे व मूर्ती
राहण्याची व्यवस्था
किल्ल्यावर राहण्याची सुविधा उपलब्ध नाही. मुक्कामासाठी नेसरी किंवा चंदगड येथे निवासाची व्यवस्था करता येते.