गगनबावडा
गगनबावडा हा कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेला निसर्गरम्य तालुका असून गगनगड (गगनबावडा किल्ला) आणि अतिवृष्टीसाठी प्रसिद्ध आहे. कोल्हापूर शहरापासून सुमारे ५५ कि.मी. अंतरावर असूनही हा परिसर डोंगराळ, हिरवाईने नटलेला आणि नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध आहे.
गगनबावड्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथून करूळ घाट आणि भुईबावडा घाट असे दोन घाटमार्ग वेगवेगळ्या दिशांनी सुरू होतात. एकाच ठिकाणाहून दोन स्वतंत्र घाटमार्ग सुरू होण्याचे हे दुर्मिळ उदाहरण आहे.
बसस्थानकापासून डावीकडील रस्ता करूळ घाटाकडे जातो. हा घाट गगनबावडा गावापासून सुमारे १ कि.मी. अंतरावर सुरू होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातून तळेरे (राष्ट्रीय महामार्ग क्र. १७) पर्यंत पोहोचतो. सुमारे ११ कि.मी. लांबीचा हा घाट पावसाळ्यात धुक्याने वेढलेला, धबधबे आणि दाट जंगलांनी सजलेला अत्यंत रमणीय दिसतो.
बसस्थानकापासून उजवीकडील रस्ता भुईबावडा घाटाकडे जातो. सुमारे १० कि.मी. लांबीचा हा घाट वैभववाडीमार्गे भुईबावडा आणि पुढे खारेपाटण (राष्ट्रीय महामार्ग क्र. १७) येथे पोहोचतो. हा मार्ग विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर परिसरात जाणाऱ्या प्रवाशांसाठी उपयुक्त आहे.
गगनबावडा परिसरातील घनदाट जंगल, थंड हवामान, निसर्गरम्य घाटरस्ते आणि विहंगम दृश्यांमुळे हे ठिकाण निसर्गप्रेमी, ट्रेकर्स आणि छायाचित्रकारांसाठी अत्यंत आकर्षणाचे केंद्र आहे.